
कोर्टात आल्यानंतर कोर्टाच्या आवारात फोटो काढणे यास मज्जाव असताना देखील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे एका महिला वकिलाचे फोटो मोबाईलवर काढून शूटिंग करताना एका व्यक्तीला वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून चोप दिलेला आहे. शुक्रवारी ही घटना घडलेली असून त्याच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत महिलांचे हजारो फोटो आढळून आलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, वकार अन्सारी ( वय 45 राहणार मिल्लत नगर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विकृत व्यक्तीचे नाव असून शुक्रवारी दुपारी भिवंडी न्यायालयात तो येऊन एका खुर्चीवर बसलेला होता. तिथून ये जा करत असलेल्या वकील महिलांचे फोटो तो मोबाईलमध्ये काढत असल्याचे वकील संघटनेच्या काही सदस्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या मोबाईलची पाहणी केली त्यावेळी त्याने हा प्रकार केल्याचे लक्षात आलेले आहे . त्याला चांगलाच चोप देऊन अखेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.