गूढ उलगडलं..हिंजवडीमध्ये आढळला होता महिलेचा मृतदेह

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी फेज दोनमध्ये समोर आलेली होती. शनिवारी रात्री झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले असून मुलाला घेऊन जाऊ देत नसल्याने पतीने पत्नीचा खून केल्याचे या प्रकरणात समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नामदेव वाळूचंद राठोड ( वय 42 ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने त्याची पत्नी सविता नामदेव राठोड ( वय 30 ) हिचा खून केलेला आहे. सदर प्रकरणी कमल गोपीचंद राठोड यांनी पोलिसात तक्रार दिलेली आहे.

फिर्यादी यांच्या मुलीचा अर्थात सविताचा काही वर्षांपूर्वी आरोपी नामदेव राठोड यांच्यासोबत विवाह झालेला होता. सविता या त्यांच्या मुलाला सांगली येथे मूळ गावी घेऊन जाण्यासाठी निघालेल्या होत्या मात्र त्यांच्या पतीने यासाठी विरोध दर्शवला. त्यांच्यात भांडण झाल्यानंतर आरोपी नामदेव याने शनिवारी रात्री हिंजवडी फेज दोन इथे त्यांचा पाठलाग करत अखेर तिच्या पोटात चाकू भोसकून खून केला आणि घटनास्थळावरून त्यानंतर फरार झालेला होता.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या अंतरावर ही घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असतानाच पोलिसांनी विक्रमी वेळेत आरोपीला गजाआड केलेले असून अवघ्या काही मिनिटांचा राग हा आरोपी पतीला आता चांगलाच महागात पडणार आहे.