शेतकऱ्यानं सीसीटीव्ही फिरवून पाहिला तर गोठ्यात चक्क..

नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात बिबट्याचा वावर समोर आलेला असून अनेकदा पिंजरे लावूनही रोज बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना आश्वी खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या बंदिस्त गोठ्यात समोर आलेले असून मंगळवारी रात्री बिबट्याने शेळीचे दोन करडांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, लक्ष्मण हनुमंता गायकवाड असे आश्वी खुर्द येथील या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी गट क्रमांक 183 मध्ये शेळ्यांचा गोठा आणि वस्ती केलेली आहे . रात्री साडेनऊच्या सुमारास सीसीटीव्हीमधून ते गोठ्याची पाहणी करत होते त्यावेळी शेळ्यांची करडे घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी सीसीटीव्ही फिरवून पाहिला त्यावेळी बिबट्याने गोठ्यात येऊन एका करडावर हल्ला चढवलेला होता.

लक्ष्मण गायकवाड यांनी तात्काळ गोठ्याकडे धाव घेतली आणि आरडाओरडा केला त्यावेळी बिबट्याने तिथून पलायन केले. गोठ्याच्या बाजूला एक आणि गोठ्याच्या आत एक असे दोन बिबटे त्यांना दिसले . बिबट्यांनी पलायन केले असले तरी परिसरातील नागरिकांनी मात्र या घटनेची दहशत घेतलेली असून रात्री अपरात्री बाहेर पडणे जीवावर बेतण्याची देखील भीती ते व्यक्त करत आहेत.