ऊसतोड करून गावी परतत असतानाच काळानं ‘ असं ‘ काही गाठलं की..

महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून कर्नाटक राज्यात ऊसतोडीचे काम करून आपल्या बिऱ्हाडासोबत घरी जात असताना ट्रॅक्टरमध्ये एक व्यक्ती झोपलेला असताना अचानकपणे ट्रॅक्टरमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. विजापूर रोडवरील अशोकनगर येथे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संदिपान अर्जुन साबळे ( वय 43 राहणार पिंपळखेड जिल्हा बीड ) असे त्यांचे नाव असून ते ड्रायव्हरच्या बाजूला बसून प्रवास करत होते तर समोरच्या ट्रॅक्टरमध्ये त्यांची पत्नी आणि इतर मजूर होते. सोलापूरमार्गे ते त्यांच्या राहत्या घरी बीड इथे चाललेले होते. पहाटे दोनच्या सुमारास विजापूर रोडवरील अशोकनगर इथे झोपेच्या गुंगीत असताना ते गाडीतून खाली पडले . शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. सदर घटनेनंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरलेली आहे.