कसा हाकणार संसाराचा गाडा ? सोमवारी सकाळी शेतात गेले अन..

महाराष्ट्रात शेतकरी बांधवांची अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली असून पिकवलेल्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च देखील सहजासहजी निघत नाही तर अनेकदा पदर पैसे टाकून माल विकावा लागतो अशी परिस्थिती असून अनेक शेतकऱ्यांनी यामुळे आत्महत्या देखील केलेल्या आहेत. असाच एक प्रकार नागपूरच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथे समोर आलेला असून एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विद्याधर पांडुरंग सरोदे ( वय 63 राहणार पांजरा काटे तालुका काटोल ) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून सततची नापीके आणि कर्ज परतफेडीची चिंता यामुळे त्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रतिकूल हवामानामुळे गेल्या चार वर्षांपासून शेतीमधून त्यांना समाधानकारक उत्पन्न होतच नव्हते त्यात झालेल्या उत्पादनाला देखील बाजारात व्यवस्थित भाव मिळत नव्हता म्हणून अखेर त्यांनी बँकेचे कर्ज घेतले मात्र तरी देखील परिस्थितीत काही बदल झाला नाही. उसने पैसे देखील घेतले मात्र पैसे फेडण्यास त्यांना अपयश येत असल्याने अखेर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ते शेतात गेले आणि त्यानंतर विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

दुपारपर्यंत ते घरी आले नाहीत म्हणून कुटुंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध सुरू केला त्यावेळी विहिरीच्या काठावर त्यांच्या चपला आढळून आलेल्या होत्या. घरच्या व्यक्तींना संशय आल्यानंतर त्यांनी विहिरीत शोध घेतला तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला. कोंढाळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली असून या प्रकरणी तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे.