अखेर सर्वांचे आदरस्थान खंडागळे सर गेले , निमित्त झालं इतकंच की..

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामाजिक उपद्रव असलेल्या डीजेचा दणदणाट मोठ्या प्रमाणात सुरू असतो. गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कार्यक्रमांना देखील डीजेचा दणदणाट सुरू असल्याचे दिसत आहे. डीजेचे ध्वनी प्रदूषण हे अनेक जणांना घातक ठरल्याचे याआधी देखील समोर आलेले असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात समोर आलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाने या घटनेत प्राण गमावलेले आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, अशोक बाबुराव खंडागळे ( वय 58 ) असे याप्रकरणी मयत शिक्षकांचे नाव असून गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर कोमात गेल्यानंतर उपचार सुरू होते. 31 मे रोजी ते सेवानिवृत्त देखील होणार होते मात्र हनुमान जयंतीच्या दिवशी ते कर्जत तालुक्यातील एका गावात गेले असताना तेथील मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सुरू होता. त्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला आणि श्रीगोंदा येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आणि काही तासांच्या आत ते कोमात गेलेले होते.

त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आलेले होते मात्र डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आणि एक महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठीमागे पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर होता तर शिक्षकांमध्ये देखील त्यांचा अत्यंत चांगला असा संपर्क होता. त्यांच्या सेवानिवृत्तीची तयारी सुरू असताना कुटुंबावर हा आघात झालेला आहे.