बारामतीतील फ्लॅटवर पोलीस पोहचले तेव्हा चक्क..

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून आता चक्क फ्लॅटमध्ये देखील असे प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना बारामती येथे समोर आलेली आहे. बारामती शहरातील हरीकृपा नगर येथे एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केलेला असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, युवराज रोहिदास बेंद्रे आणि शांतीलाल शिवाजी बेंद्रे ( दोघेही राहणार कर्जत जिल्हा अहमदनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून हरिकृपा नगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत हा व्यवसाय सुरू होता . उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना याप्रकरणी माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी निर्भया पथकासह साध्या गणवेशात कर्मचाऱ्यांना पाठवले तसेच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना याप्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आले.

कारवाईसाठी पथक सज्ज झाल्यानंतर एक बनावट ग्राहक तिथे पाठवण्यात आला त्यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या तीन नोटा देण्यात आल्या तिथे गेल्यानंतर त्याने आरोपी व्यक्तींशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी वेश्यागमनासाठी महिला पुरवू शकतो असे सांगितल्यानंतर बोगस ग्राहकाने पोलिसांना इशारा केला आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली. घटनास्थळी सहा हजार नऊशे रुपये आढळून आलेले असून तीस हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासोबत उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे .