
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक सरपटणारे प्राणी बिळाबाहेर येतात त्यामध्ये विषारी साप आणि नाग यांचा देखील समावेश आहे. घरात साप निघल्यानंतर भल्याभल्यांची गाळण उडते मात्र अशावेळी सर्पमित्राची आठवण येते आणि आपला जीव धोक्यात घालत सर्पमित्र विषारी सापापासून नागरिकांचे रक्षण करतात सोबतच सापाला देखील जीवनदान देतात मात्र अशाच एका दुर्दैवी घटनेत बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील एका सर्पमित्राने प्राण गमावलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , विजय छबुराव यादव असे या सर्पमित्राचे नाव असून ते लोणी भापकर तालुका बारामती येथील रहिवासी आहेत . 15 ऑगस्ट रोजी साप पकडण्यासाठी ते सुप्याजवळील खराडवाडी येथे गेले होते त्यावेळी त्यांना विषारी नागाने दंश केलेला होता . मूरघासाच्या खड्ड्यात नाग आढळून आला त्यानंतर त्यांना संपर्क करण्यात आला म्हणून त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतलेली होती.
नाग पकडत असताना विषारी नागाने त्यांना दंश केला अशा जखमी अवस्थेत असताना देखील त्यांनी या विषारी नागाला जंगलात सोडून दिले आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. 16 ऑगस्ट रोजी त्यांची व्यवस्थित होती मात्र अखेर मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
गेल्या 30 वर्षांपासून सर्पमित्र म्हणून ते परिसरात सर्वांनाच परिचयाचे होते . कुणाच्या घरी साप निघाला तर सर्वप्रथम त्यांचे नाव यायचे . त्यांना संपर्क केला जायचा. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी आयुष्यभर मदत केली आणि कुणाकडून कधी पैसे घेतले नाहीत. त्यांच्या अशा अकाली मृत्यूमुळे शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.