
ग्रामीण पातळीवर किरकोळ कारणावरून वाद घालण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून पुणे जिल्ह्यातील एका कुटुंबाला हा प्रकार चांगलाच महागात पडलेला आहे. शेजाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी जुन्नर न्यायालयाने तब्बल आठ आरोपींना नऊ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे सोबतच पाच हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रवींद्र कारभारी जाधव , विलास कारभारी जाधव , रेवजी दादाभाऊ जाधव , कारभारी दादाभाऊ जाधव , मयत नवनाथ राजे जाधव , नंदा संजय जाधव , पार्वतीबाई कारभारी जाधव , मनीषा बबन जाधव , सुरेखा रवींद्र जाधव ( सर्वजण राहणार शिंदे मळा बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
बोरी बुद्रुक शिंदे मळा येथे 11 मार्च 2011 रोजी फिर्यादी असलेले कांताराम बबन जाधव ( वय 43 राहणार शिंदे मळा ) यांना शेतीच्या बांधावरून बेकायदेशीररित्या जमाव जमवत आरोपींनी फिर्यादी यांच्या गट क्रमांक 242 मधील शेतीच्या बांधावर असलेली झाडे तोडली. जमिनीचा दावा कोर्टात सुरू असताना देखील हा प्रकार आरोपींनी केलेला होता त्यानंतर नारायणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना दोषी ठरवत अखेर नऊ महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि सोबतच 5000 रुपये दंड जुन्नर न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेला आहे.