
फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या मुंबईत समोर आलेला असून पीएमओसाठी आपण काम करत आहे असे सांगत लोकांकडून पैसे उकळणाऱ्या एका तोतया व्यक्तीच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील जेएनपीटी इथे कार्यरत असलेला एक अधिकारी देखील त्याला मदत करण्यात करत असल्याची सीबीआयला माहिती मिळालेली असून त्याचा देखील तपास सुरू असल्याची माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पवन पटेल असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्या विरोधात एका व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाकडे लेखी तक्रार पाठवलेली होती. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ही तक्रार सीबीआयकडे पाठवली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पवन पटेल याने पीएमओ कार्यालयात आपण कार्यरत असून आपला विभाग पंतप्रधानांसाठी गुप्तचर यंत्रणेचे काम करतो असे काही लोकांना सांगितले होते.
आपल्याकडे असलेले पद हे अत्यंत संवेदनशील असून आपण कोणतेही कंत्राट कोणालाही मिळून देऊ शकतो असे सांगत त्याने अनेक जणांना आपल्या जाळ्यात ओढलेले होते . जेएनपीटी बंदरामध्ये कार्यरत असलेला एक अधिकारी देखील त्याला मदत करत आहे असे देखील या पत्रात म्हटलेले असून पवन पटेल यांनी अनेक जणांकडून पैसे घेतले मात्र कामे कुणाचीच केली नाहीत. मोठ्या पदावर तो कार्यरत असल्याकारणाने अनेक जणांनी घाबरून त्याला पैसे परत मागण्याची देखील हिम्मत दाखवली नाही असे या पत्रात नमूद केलेले आहे. सदर प्रकरणाचा सध्या सीबीआय तपास करत आहे.