आत्महत्या नव्हे तर ‘ ऑनर किलिंग ‘ प्रकरण उघडकीस , मुलीचा बाप ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात ऑनर किलिंगचा एक धक्कादायक असा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आलेला असून मुखेड तालुक्याच्या मनूतांडा इथे एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झालेला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार देखील केले मात्र त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि मुक्रमाबाद पोलिसांनी अखेर या पित्याला गुरुवारी रात्री बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , शामकाबाई अण्णाराव राठोड ( वय १६ ) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव असून पंचफुलाबाई अण्णाराव राठोड ( वय 42 राहणार मनूतांडा ) यांनी नवऱ्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. दोन ऑगस्ट रोजी शामकाबाई अण्णाराव राठोड या सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला होता मात्र या प्रकरणी ऑनर किलिंगची शक्यता व्यक्त होत होती त्यानंतर मूक्रमाबाद पोलिसांनी मनूतांडा गाठला त्यावेळी तिने गळफास लावून आत्महत्या केली आहे असे त्यांना सांगण्यात आले.

सकाळी साडेआठ वाजता झालेली आत्महत्या आणि दोन तासात प्रेत जाळून अंत्यसंस्कार यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी श्यामकाबाई हिचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे तेथील काही हाडे आणि राखेचे नमुने तपासणीसाठी घेतलेले होते. सदर प्रकरणात कोणीही काही बोलत नसल्याने संशयित व्यक्तीची पत्नी पंचफुलाबाई यांना पोलिसांनी विश्वासात घेतले त्यावेळी त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि झालेला प्रकार कथन केला.

शामकाबाई हिचे राजुरा तांडा येथील तुषार चव्हाण नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते त्यामुळे त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती मात्र या विवाहाला कुटुंबाचा विरोध होता. दोन ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी अण्णाराव यांनी मुलीला एकटीला घरात ठेवले मात्र तरी देखील ती तुषार सोबतच लग्नाचा आग्रह करत असल्याने अखेर अण्णाराव याने कोयत्याने तिच्या मानेवर आणि हातावर वार केले त्यानंतर आत्महत्येचा देखावा निर्माण करून तात्काळ अंत्यसंस्कार देखील उरकून घेण्यात आले.

आरोपींनी यानंतर कुटुंबीयांसोबत शेजारच्या व्यक्तींना देखील या घटनेची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून धमकी दिली त्यामुळे अनेक जणांनी या प्रकरणात मौन बाळगले होते मात्र अखेर पोलिसांनी विश्वासात घेऊन पंचफुलाबाई यांची चौकशी केली त्यावेळी त्यांनी आपल्या पतीने हा प्रकार केल्याची कबुली दिलेली असून पोलिसांनी तात्काळ आरोपी अण्णाराव गोविंद राठोड ( वय 45 ) याला अटक केलेली आहे.


शेअर करा