
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार किरकटवाडी येथे समोर आलेला असून आर्थिक विवंचनेतून सिंहगड रस्त्यावर एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. आपली फसवणूक झाल्याची सुसाईड नोट या व्यक्तीने लिहून ठेवलेली असून पैशाच्या वसुलीसाठी काही जणांनी आपल्याला तसेच आपल्या कुटुंबीयांबद्दल देखील अपशब्द उच्चारले त्यातून आपण व्यथित झालेलो होतो असेही म्हटलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, निलेश रामचंद्र जंगम ( वय 40 वर्ष उत्सव सोसायटी किरकटवाडी सिंहगड रोड मूळ राहणार सातारा जिल्हा ) असे मयत व्यक्ती यांचे नाव आहे. दोन पानांची सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेले असून त्यामध्ये झालेल्या छळाची कहाणी सांगितलेली आहे. निलेश जंगम हे पत्नी आणि दोन मुलांसह घर भाड्याने घेऊन राहत होते. गावाकडे त्यांनी घरगुती कार्यक्रमासाठी म्हणून पत्नी आणि मुलांना पाठवून दिले आणि त्यानंतर भावाला फोन करत त्यांना नीट उतरून घे आणि उद्या परत पाठवून दे असे सांगितले होते. निलेश जंगम यांचे वडील आणि भाऊ पत्नी आणि मुलांना सोडण्यासाठी म्हणून पुण्याला आले मात्र निलेश हे फोन उचलत नव्हते.
संध्याकाळी सातच्या सुमारास निलेश यांच्या घरी वडील भाऊ पत्नी आणि मुले पोहोचले त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. पत्नीकडे असलेल्या दुसऱ्या चाविने घराचा दरवाजा उघडला त्यावेळी निलेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी दोन पानांची एक चिठ्ठी आढळून आलेली असून पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतलेली आहे.
सदर चिठ्ठीमध्ये एका व्यक्तीने सोबत व्यवसाय करू असे सांगत माझ्या नावाने दुसऱ्याकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले आणि माझी फसवणूक केली . ज्याच्याकडून पैसे घेतले तो व्यक्ती आता पैशाचा तगादा लावत असून पाच लाख रुपये मागत आहे आणि माझ्या पत्नीबद्दल देखील घाण भाषेत बोलत आहे. मी त्याचे पैसे परत देऊ शकत नाही. मी माझे जीवन संपवत असून माझी पत्नी आणि मुलांचा यात काहीच दोष नाही. ज्याने पैसे घेतले तो आणि त्याची पत्नी यास जबाबदार आहेत , असे देखील त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे.