
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलेली असून अत्याचार पीडित एका महिलेने पोलीस स्टेशनमध्येच विष घेतलेले आहे. वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत ही पीडित महिला राहत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करावी यासाठी पीडित महिलेने विष घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पीडित महिला वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत राहत असून तिचे वय अंदाजे 36 वर्षे आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये तिने इरफान शेख नावाच्या व्यक्तीच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला होता. त्याच्यावर 376 आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही करण्यात आली होती मात्र जामीन मिळाल्यानंतर तो आणि त्याच्या नातलगांनी आपल्याला त्रास देणे सुरू केलेले आहे असे पीडित महिलेचे म्हणणे होते.
वरोरा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश चौरे हे आरोपीला मदत करत असल्याचा आरोप महिलेने केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले निलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी महिलेने वरोरा येथे शनिवारी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली होती मात्र कारवाई झाली नाही म्हणून अखेर महिलेने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये विष प्राशन केलेले आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात तिला पाठवण्यात आलेले आहे .